Press "Enter" to skip to content

उरण तालुक्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी दुर्लक्षित

९०० वर्षाचा ऐतिहासिक वारसा असलेला ११ व्या शतकातील ताम्रपट जपण्याची गरज ! 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । उरण । कौशिक मधुकर ठाकूर । 🔶🔷🔶

९०० वर्षाचा ऐतिहासिक वारसा असलेला ११ व्या शतकातील ताम्रपट
उरण तालुक्यातील काही गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या गावांमध्ये आज ही इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक गोष्टी अस्तित्वात असल्या तरी त्याचे योग्य प्रकारे संवर्धन न झाल्याने हा ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षित होण्याबरोबरच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

अशाच प्रकारचा प्राचीन ऐतिहासिक ठेवा असणारे उरण तालुक्यातील आवरे गाव. आवरे गावाच्या परिसरात फेरफटका मारताना आपल्याला अनेक ऐतिहासिक गोष्टी पाहायला मिळतात.

आवरे व पिरकोन या ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे व दुर्लक्षित गावावर प्रकाश पडला तो १९९८ मध्ये ठाणे जिल्ह्यातील चरई येथे झालेल्या एका उत्खननात सापडलेल्या ताम्रपटावरून. ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला मजकूर असतो ताम्रपटात सामान्यता एकात एक ओवलेले तीन पत्रे असतात. पहिल्या पत्र्याची पहिली बाजू व शेवटच्या पत्र्याची मागची बाजू कोरिच असते याचा अर्थ ते त्याचे कव्हर असते. पहिल्या पत्र्याची मागची बाजू, दुसऱ्या पत्र्याची दोन्ही बाजू, तिसऱ्या पत्र्याची पहिली बाजू याच्यावर मजकूर लिहिलेले असतो. आवरे-पिरकोनचा ताम्रपटही अशाच स्वरूपाचा असून जवळपास सात किलो वजनाचा असून, एकशे एक ओव्यामध्ये दानपत्राचा मजकूर लिहिलेला आहे.

ताम्रपटावर प्रामुख्याने दानपत्रे किंवा राजाज्ञा असेच पुढच्या आज्ञा कोरून ठेवण्याची प्रथा असायची त्याच प्रथे प्रमाणे ११ व्या शतकात म्हणजे २४ ऑक्टोबर ११२० मध्ये गत शक संवतातील अश्विन महिन्यातील अमावस्येला झालेल्या सूर्यग्रहणाच्या निमित्ताने शिलाहार राजा महाकुमार केशीदेव यांनी त्यावेळचे अऊरे आताचे आवरे व परुकुने आताचे पिरकोन या दोन गावांचे उत्पन्न पंधरा ब्राह्मणांना समप्रमाणात वाटून देण्याचा संकल्प केला होता.

या ताम्रपटाने आवरे परिसरातील शिलाहार राजवटीला अधोरेखित केलेच पण त्याच बरोबर फारशी नोंद नसलेला अल्पायुषी असलेल्या महाकुमार केशीदेवची ही इतिहासाने दखल घेतली, हा ताम्रपट लिहिताना केशीदेवाने आधी शिवमंदिरात जाऊन शिवाचे पूजन करून फुले वाहिली. सूर्यदेवास नमस्कार करून राम क्षेत्रातील शील तीर्थाच्या खाऱ्या पाण्याने हा दान संकल्प केला, आवरे गावच्या समुद्राकडील दिशेला शील (आवरे गावात आज अस्तित्वात असणारे तळे तेव्हा येथे समुद्राचे पाणी येत होते) नावाने ओळखणारा खाऱ्या पाण्याचा जलाशय असून त्याला जोडून राम अगर ( गावच्या पश्चिमेकडील भाग) नावाचे एक क्षेत्र आहे राम अगर म्हणजेच आवरे गाव ते गोवठणे गावातील भवानी मंदिरा पर्यतचा भाग होय.

दान पत्रात गावचे उत्पन्न वाटून दिले असले तरी गावच्या हद्दीतील मिठागरातून मिळणारा कर वगळण्यात आला आहे. आवरे व पिरकोन दोन्ही गावच्या सीमा स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या आहेत, पिरकोन गावाच्या दक्षिणेस आवरे गावच्या उत्तरेस डोंगरी पूजी पाणी लोटा असा उल्लेख आहे, हा भाग म्हणजे आवरे खप ते कोमना देवीचा परिसर असेल तर आवरेच्या दक्षिणेस व पश्चिमेस खारा नदी ची हद्द मानली आहे. खारा नदी म्हणचे पाताळगंगा नदी व समुद्राचा भाग आहे, तसेच पिरकोनच्या पूर्वेस डोंगरी पाणी लोटा व उत्तरेस तलाईका असे आहे हा भाग म्हणजे कदाचित तलबंदखार असू शकेल.

डॉ.शशिकांत धोपटे यांनी 1998 साली या ताम्रपटाचा अर्थ लावला. त्यानंतर तो ताम्रपट कुठे गेला हे फारसे कोणाला माहिती नाही. इतिहास अभ्यासक तुषार म्हात्रे सर यांच्या अंदाजानुसार तो “छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई” येथे आहे.

संकलन – घनश्याम कडू

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.