Press "Enter" to skip to content

दुर्गा..! ….. आजची

दुर्गा..! ….. आजची

तशी दुर्गा तर प्रत्येकीत वसलेली असते.
त्या दुर्गेला एकाच महिषासुराशी
लढावे लागले.
आजच्या दुर्गेला तर
रोज लढावे लागते.
बरं राक्षसाने सरळ सरळ
राक्षसाचेच रुप धारण करावे ना!
तसही होत नाही.

आजकालचे सारे राक्षस
मायावी झालेत..
आपल्याच नातेवाईकांचे नाहीतर मित्रांचे रुप धारण करतात.
दुर्गा बिचारी भांबावून जाते.
कोण सूर कोण असूर
याचा अंदाज घेत रहाते.
तिचे अर्धे जगणे या
दडपणातच निघून जाते.

प्रत्येकवेळी सभोवती असूरच असतात असे नाही पण…
तिला असूरांची इतकी
सवय झालेली असते की
ती विश्वास ठेवायला घाबरते
कोणाच्याही चांगूलपणाकडे
संशयाच्या नजरेनेच पहाते..

दुर्गा देवीचे बरे आहे.
तिला आठ आठ हात आहेत.
एकाच वेळी अनेक शस्त्र चालविण्याची मुभा आहे.
आजच्या दुर्गेला दोनच हात
पण काम मात्र आठ हातांना
पुरून उरेल इतकं सारं आहे.
ती ही काही मागे हटणारी नाही.
करते दोनच हातांनी
आठ हातांचे काम
सांभाळते उरीपोटी
अनेक जबाबदाऱ्या

देवीला महिषासुर वधानंतर
सारे जग पुजू लागले..
तिला मखरात बसवून
त्यांनी तिचे श्रेष्ठत्व मान्य केले.
आजच्या देवीचे काय??
अनेकदा प्रोत्साहनाचे, कौतुकाचे शब्द मिळत नाहीत.
तिला मानसन्मानही सहजी लाभत नाही.

त्या देवीचे युद्ध नऊ दिवसात संपले
देवी विजयी झाली.
सारे जण विजयादशमी
साजरे करू लागले..

आजच्या देवीचे काय??
युगामागून युगे लोटली
तिचे युद्ध सरत नाही
महिषासुर मर्दन होत नाही.

तुम्हीच सांगा ती कधी आणि कशी
विजयादशमी साजरी करणार???

डॉ. समिधा गांधी, पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.