Press "Enter" to skip to content

SRH ची पाचव्या नंबर वर उडी

गुरुवारी (२२ ऑक्टोबर) दुबई येथे आयपीएल २०२०च्या ४० व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने राजस्थान रॉयल्सला ८ विकेट्सने पराभवाचं पाणी पाजलं. हा हैदराबादचा या हंगामातील चौथा विजय होता. हैदराबादच्या या विजयाचा हीरो मनीष पांडे ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

नाणेफेक जिंकून हैदराबाद संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि राजस्थानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १५४ धावा केल्या होत्या. या धावांचे आव्हान हैदराबाद संघाने १८.१ षटकात केवळ २ विकेट्स गमावत १५६ धावा करत पूर्ण केले.

हैदराबाद संघाकडून फलंदाजी करताना मनीष पांडेने सर्वाधिक धावा केल्या.

त्याने ४७ चेंडूत ८३ धावांची तडाखेबंद अर्धशतकी खेळी केली. यामध्ये ४ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता. त्याच्यासोबतच विजय शंकरनेही ५१ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त केवळ जॉनी बेयरस्टोने १० धावा केल्या, तर कर्णधार डेविड वॉर्नर केवळ ४ धावा करत बाद झाला.

राजस्थानकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरनेच २ विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना राजस्थानकडून यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २६ चेंडूंचा सामना करताना ३६ धावा केल्या. यामध्ये १ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. त्याच्यासोबतच अष्टपैलू बेन स्टोक्सने ३० धावांची खेळी केली. इतर फलंदाज तर २० धावांच्या आतच तंबूत परतले.

हैदराबादकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज जेसन होल्डरने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटकांत ३३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. सोबतच विजय शंकर आणि राशिद खान या गोलंदाजांनीही प्रत्येकी एक विकेट आपल्या खिशात घातली.

या विजयासह हैदराबादला २ गुण मिळाले. याचा फायदा घेत हैदराबाद संघ ८ गुणांसोबत गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर विराजमान झाला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.