Press "Enter" to skip to content

दिल्ली पुन्हा एकदा टेबल टॉप

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे बुधवारी (१४ ऑक्टोबर) आयपीएलच्या तेराव्या हंगामातील ३०वा सामना झाला. या सामन्यात गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्याच्या चुरसीने उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने १३ धावांनी राजस्थान रॉयल्सला मात दिली. दरम्यान दिल्लीच्या वेगवान गोलंदाजाने एन्रिक नॉर्किएने इतिहास रचला.

त्याने राजस्थानच्या डावातील तिसऱ्या षटकाचा पाचवा चेंडू तब्बल १५६.२२ किमी दर ताशी वेगाने टाकला. हा आयपीएलच्या १३ हंगामाच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू ठरला आहे. यापुर्वी हा विक्रम डेल स्टेनच्या नावावर होता. त्याने २०१२ साली १५४.४० किमी दर ताशी वेगाने वेगाने गोलंदाजी करत हा किर्तीमान मिळवला होता.

मात्र, नॉर्किएने तिसऱ्या षटकातील सलग ४ चेंडू १५० किमी दर ताशी वेगाच्या आसपास टाकले आहेत. यासह आयपीएलमधील ३ सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम त्याने नावावर करत, सर्वांना चकित केले आहे.

असे असले तरी, नॉर्किएच्या त्या षटकात राजस्थानच्या जोस बटलरने एकापाठोपाठ एक सलग २ चेंडू सीमारेषेबाहेर पाठवले. पण नॉर्किएने षटकातील शेवटच्या चेंडूवर बटरलचा त्रिफळा उडवला. त्यामुळे बटलर ९ चेंडूत २२ धावा करत मैदानाबाहेर गेला.नॉर्किएच्या या अफलातून गोलंदाजीला पाहिल्यानंतर वेगाचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रेट लीने त्याचे कौतुक केले आहे. तर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्रीही त्याची प्रशंसा करण्यासाठी स्वत:ला रोखू शकले नाहीत.

दिल्लीच्या या विजयाचा शिल्पकार एन्रीच नॉर्किए ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

नाणेफेक जिंकत दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराने घेतलेला हा निर्णय संघातील इतर खेळाडूंनी सार्थ ठरवला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने निर्धारित २० षटकात ७ विकेट्स गमावत १६१ धावा कुटल्या. दिल्लीने दिलेल्या या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान संघाने निर्धारित २० षटकात ८ विकेट्स गमावत केवळ १४८ धावाच केल्या.

राजस्तान संघाकडून फलंदाजी करताना या हंगामातील आपला दुसराच सामना खेळत असलेला अष्टपैलू बेन स्टोक्सने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३५ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ४१ धावांची खेळी केली. यासोबतच रॉबिन उथप्पा (३२), संजू सॅमसन (२५) आणि यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलरने (२२) धावा केल्या. याव्यतिरिक्त इतर फलंदाजांना २० धावांचा आकडा पार करता आला नाही. त्यात कर्णधार स्टीव्ह स्मिथही अपयशी ठरला. तो केवळ १ धाव करत झेलबाद झाला.

दिल्ली संघाकडून गोलंदाजी करताना तुषार देशपांडे आणि एन्रीच नॉर्किए या धडाकेबाज गोलंदाजांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. यासोबतच कागिसो रबाडा, आर अश्विन आणि अक्षर पटेल यांनीही प्रत्येकी एक विकेट आपल्या खिशात घातली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाकडून सलामीवीर फलंदाज शिखर धवनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३३ चेंडूत ५७ धावांची अर्धशतकी खेळी केली. यामध्ये २ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. यासोबतच कर्णधार श्रेयस अय्यरनेही ५३ धावांची तडाखेबंद अर्धशतकी खेळी केली. या दोघांंव्यतिरिक्त इतर फलंदाज २० धावांच्या आतच गारद झाले.

राजस्थान संघाकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. यासोबतच जयदेव उनाडकटनेही २ विकेट्स आपल्या नावावर केल्या, तर कार्तिक त्यागी आणि श्रेयस गोपाळ यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

दिल्ली संघाला या विजयासह २ गुण मिळाले आहेत. या गुणांचा फायदा घेत दिल्ली संघ गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर विराजमान झाला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.