Press "Enter" to skip to content

घरगुती वीज बिले माफ करण्याची जनता दलाची मागणी

सिटी बेल लाइव्ह / उस्मानाबाद #

कोरोना महामारी आपत्तीमुळे आर्थिक संकटात असलेले व दरमहा 300 युनिट्स च्या आत वीज वापरणारे राज्यातील सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची गेल्या तीन महिन्याची वीज बिले माफ करण्यासाठी जनता दल सेक्युलर पक्षाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे जिल्हा पुरवठा अधिकारी चारुशिला देशमुख यांच्यामार्फत निवेदन सादर केले. निवेदन देताना ॲड रेवण भोसले, सायसराव जाधवर, ॲड गणेश देशमुख ,सतीश गुंड ,राजेंद्र घोलकर आदी उपस्थित होते.
देशात आणि राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली, त्याला आता 100 दिवस लोटले असून राज्य सरकारने 31 जुलैपर्यंत त्यात वाढ केली आहे .या काळात रोजीरोटीच बंद असल्याने उदरनिर्वाह करताना गरीब, कष्टकरी, कनिष्ठ मध्यमवर्गीय या सर्वांचीच आता दमछाक झाली आहे. त्यामुळेच तीन महिन्यांची वीज देयके येताच जनतेत असंतोष निर्माण झाला आहे .त्यामुळे राज्य सरकारने दरमहा 300 युनिटपर्यंत वीज वापर असणारे राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील तीन महिन्यांची वीज देयके माफ करावीत असे जनता दल सेक्युलर पक्ष मागणी करीत आहे. कोरोना विषाणू च्या साथीने देशात पाय पसरायला सुरूवात केल्याचे लक्षात येताच 25 मार्च पासून देशभरात टाळेबंदी लागू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्याला आता शंभर दिवस लोटले आहेत. या संपूर्ण काळात स्वस्त व काही प्रमाणात दिलेले मोफत धान्य वगळता केंद्र वा राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत जनतेला झालेली नाही. मोदी सरकारने जाहीर केलेल्या तथाकथित 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमधून गरिबांच्या ताटातील कोरड्या भाकरीवर चमचाभर तेलही पडलेले नाही .महाराष्ट्र हे तुलनेने देशातील सर्वार्थाने पुढारलेले राज्य, आर्थिक दृष्ट्याही प्रगत .पण राज्य सरकारने ही एक पैशाची मदत जनतेला दिलेली नाही. या पार्श्वभूमीवर तीन महिने घरात बसून काढाव्या लागल्याने हातावर पोट असलेल्या आणि पगारावर अवलंबून असलेल्या सर्वांचीच दमछाक झाली आहे. लॅकडाऊन काही अंशी उठले असले तरी अजूनही अनेकांची रोजीरोटी सुरू झालेली नाही. गाठीशी असलेला थोडा बहुत पैसा आहे संपत आला आहे .त्यामुळे अनेकांच्या मनात उपासमारीची भीती डोकावू लागली आहे. किंबहुना भाडे भरता आले नाही, वीज बिल भरता येत नाही म्हणून आत्महत्या केल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत. एकीकडे ही स्थिती असतानाही महावितरण कंपनी ,बेस्ट तसेच अदानी, टाटा पाॅवर यासारख्या खाजगी वीज कंपन्यांनी मागील तीन ते चार महिन्यांची वीज देयके ग्राहकांना पाठविली असून ती भरण्यासाठी तगादा लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या बिलातील वाढीबद्दल आणि वीज दरवाढीबद्दल लोकांच्या मनात नाराजी आहेच पण रोजीरोटी सुरू नसताना कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न असतानाच ही बिले भरण्याचा तगादा सुरू झाल्याने लोकांमध्ये अधिक असंतोष निर्माण झाला आहे .या पार्श्वभूमीवर दरमहा 300 युनिटपर्यंत वीज वापर असणारे राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील तीन महिन्यांची वीज देयके माफ करण्यात यावीत व त्यासाठी आवश्यक त्या रकमेची भरपाई राज्य सरकारने महावितरण वा संबंधित कंपनी कोविड पॅकेज वा अनुदान स्वरूपात द्यावी असे जनता दल सेक्युलर पक्षाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.