Press "Enter" to skip to content

गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा ! विशेष परिसंवादात मागणी


गोहत्या, गोतस्करी, तसेच अवैध पशुवधगृहांवर प्रतिबंध कधी लागणार ? – श्री. संजय शर्मा, श्रीशिवछत्रपती गोरक्षा जनआंदोलन 🔷🔶🔷


सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔶🔷


गोवंश हत्या बंदी कायदा असतांना राज्यात सर्वत्र दिवसाढवळ्या गोहत्या होत आहेत. राज्यभरात होणार्‍या सर्व गोहत्या अन् गोतस्करी यांविषयी आम्ही पुराव्यांसह माहिती गोळा केली आहे. ती लवकरच राज्य सरकारकडे सुपूर्त करणार आहोत. सरकारने यांवर कायद्याच्या आधारे तातडीने कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. गोवंश हत्या प्रतिबंध कायदा करून अनेक वर्षे झाली आहेत, तरी सरकार या कायद्याचा वापर गोहत्या, गोतस्करी आणि अवैध पशुवधगृह यांच्यावर प्रतिबंध कधी लावणार आहे ?, असा परखड प्रश्‍न धुळे येथील श्रीशिवछत्रपती गोरक्षा जनआंदोलनाचे आद्य गोरक्षक श्री. संजय शर्मा यांनी केला. ते हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्रात गोमाता सुरक्षित आहे का ?’ या विशेष परिसंवादात ते बोलत होते.

जर याबाबत काही कारवाई करण्यात आली नाही तर, येत्या दोन-तीन महिन्यांत गोरक्षणासाठी राज्यस्तरावर जनआंदोलन उभे केले जाईल. यात राज्यातील 400 तालुक्यांतील गोरक्षक हजारोंच्या संख्येने सहभागी होतील, अशी चेतावनीही श्री. शर्मा यांनी या वेळी दिली.

हा परिसंवाद ‘यू-ट्यूब लाइव्ह’ आणि ‘फेसबूक’ यांच्या माध्यमांतून 23,453 लोकांनी पाहिला, तर 36,209 लोकांपर्यंत पोचला. गोवंशांची हत्या रोखण्यासाठी विविध जिल्ह्यांतून मुख्यमंत्र्यांना ऑनलाईन निवेदने पाठवण्यात आली. या विरोधात ‘ऑनलाईन पिटिशन’च्या माध्यमातूनही जागृती करण्यात आली. या मोहिमेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याचा परिणाम #गोहत्यारोकोधर्म_बचाओ हा विषय ट्वीटरवर देखील ट्रेडींगमध्ये आला होता.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘आज महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभरात गोवंश पूर्णपणे असुरक्षित आहे. देशभरात 66 हजार वैध-अवैध पशुवधगृहे कार्यरत आहेत. 1947 या वर्षी देशात 90 कोटी देशी गोवंश होता, आज 2020 मध्ये 1 कोटी तरी शिल्लक आहे का, याविषयी शंका आहे. देशातील 29 राज्यांपैकी 22 राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा असतांना देशभरात राजरोसपणे गोहत्या चालू आहेत. हे असेच चालू राहिले, तर येणार्‍या पिढीला गोमाता केवळ चित्रामध्येच दाखवण्याची वेळ येऊ शकते. आतातरी देशस्तरावर गोवंश हत्याबंदी करून त्याची कठोर अंमलबजावणी करावी,’ अशी मागणीही श्री. घनवट यांनी केली.

जळगाव येथील अहिंसा तीर्थ गोशाळेचे व्यवस्थापक श्री. अभय सिंह यावेळी म्हणाले की, ‘गोवंश बचावासाठी पूर्वी पोलिसांचे साहाय्य मिळत होते; मात्र राजकीय दबावामुळे पोलिसांकडून माघार घेतली जाते. अनेकदा अवैधरित्या वाहतूकीमध्येही गोवंश जखमी आणि मृत्त अवस्थेत आढळतात.’ हिंदु विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता संघटक नीलेश सांगोलकर म्हणाले, ‘गोवंश कत्तलखान्यात किंवा अवैधरित्या अन्यत्र नेण्यास प्रतिबंध करणारे अनेक कायदे आहेत. मात्र शासनाने इच्छाशक्ती दाखविण्याची गरज आहे. आज गोतस्करांच्या जागी गोरक्षकांवर गुन्हे दाखल करून त्यांना तडीपार केले जात आहे. हा चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचा प्रकार आहे. अशा अन्यायाच्या विरोधात आम्ही लढा देत आहोत.’ हिंदू गोवंश रक्षा समितीचे समन्वयक श्री. दिप्तेश पाटील गोरक्षणाविषयीचे अनुभव सांगताना म्हणाले की, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गोवंश मुंबईसारख्या शहरात आणला जातो आणि त्याची कत्तल केली जाते; मात्र गोहत्या आणि गोतस्करी करणार्‍यांना अपेक्षित शासन झालेले नाही. उलट गोरक्षकाला त्रास दिला जातो. याविषयी जनआक्रोश निर्माण होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.